मुख्य संपादक विनायक पाटील
चोपडा (प्रतिनिधी) : भारतीय समाजात विवाहापूर्वी वधू-वरांची कुंडली जुळवून ३६ गुणांचा विचार केला जातो. मात्र, निरोगी भावी पिढीसाठी विवाहापूर्वी वधू-वरांनी थॅलेसेमियाची तपासणी करून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे कुंडलीतील ३६ गुणांसोबत थॅलेसेमिया चाचणीचा ‘३७ वा गुण’ जुळवावा, असे आवाहन रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० च्या थॅलेसेमिया निर्मूलन प्रकल्पाच्या प्रमुख तथा कोसला फाउंडेशनच्या रोटे. डॉ. सई नेमाडे यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ चोपडा आणि सौ. शरदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित थॅलेसेमिया जनजागृती प्रकल्पांतर्गत महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. नेमाडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत थॅलेसेमिया या आजाराची कारणे, त्याचे परिणाम आणि प्रतिबंधात्मक उपाय याबाबत मार्गदर्शन केले.
थॅलेसेमिया हा जनुकीय वारशाशी संबंधित आजार असून, आई-वडिलांकडून मुलांमध्ये तो संक्रमित होऊ शकतो. विशेषतः दोन्ही पालकांमध्ये संबंधित जनुकीय दोष असल्यास अपत्याला गंभीर स्वरूपाचा थॅलेसेमिया होण्याचा धोका असतो. काही समाजघटकांमध्ये तसेच नात्यात विवाह होणाऱ्या कुटुंबांमध्ये या आजाराचा धोका अधिक असू शकतो, असे डॉ. नेमाडे यांनी स्पष्ट केले.
थॅलेसेमियाचे मेजर आणि मायनर असे प्रकार आहेत. थॅलेसेमिया मेजर असलेल्या रुग्णांना वारंवार रक्तसंक्रमणाची आवश्यकता भासू शकते. त्यामुळे रक्ताचा अपुरा साठा, रक्तसंक्रमणातून संसर्ग होण्याचा धोका, शरीरात लोहाचे प्रमाण वाढणे आणि ग्रामीण भागात उपचारांच्या सुविधांचा अभाव यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.
या आजाराचा धोका कमी करण्यासाठी विवाहापूर्वी वधू-वरांनी थॅलेसेमियाची तपासणी करून घेणे, गर्भधारणेपूर्वी आणि गर्भावस्थेत आवश्यक तपासण्या करणे, नात्यातील विवाहाबाबत वैद्यकीय समुपदेशन घेणे, नियमित रक्तदान करणे, रुग्णांना आर्थिक मदत करणे आणि व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
थॅलेसेमिया निर्मूलनासाठी रोटरीचा पुढाकार
थॅलेसेमिया निर्मूलन हा रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चा विशेष सेवा प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत थॅलेसेमियाबाबत जनजागृती करणे, नागरिकांची तपासणी करण्यासाठी उपक्रम राबविणे आणि आजारग्रस्त रुग्णांना मदत करणे यावर भर देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. गौतम वडनेरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. रुपाली पाटील यांनी केले, तर रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे. संजय बारी आणि कुंदन पाटील यांनी आभार मानले.

✍🏻मुख्य संपादक – विनायक जगन्नाथ पाटील
























