धरणगाव (प्रतिनिधी राजू बाविस्कर)
तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व महसूल कर्मचाऱ्यांचा सहभाग, अवैध गौण खनिज वाहतूकदारांना प्रशासनाचा इशारा
धरणगाव (प्रतिनिधी राजू बाविस्कर) : धरणगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू ठेवला असून, वाकटूकी येथे अवैध वाळू वाहतूक करणारा तब्बल १६ टायर ट्रक महसूल पथकाने पकडला आहे. तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली.
धरणगाव तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. याच अनुषंगाने वाकटूकी येथे अवैधरीत्या वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत १६ टायर ट्रक ताब्यात घेतला.
या कारवाईत तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, मंडळ अधिकारी हेमंत महाजन, ग्राम महसूल अधिकारी फिरोज खाटीक, रोहित इंगळे, ग्राम महसूल सेवक तसेच पोलीस पाटील भिका पाटील यांनी सहभाग घेतला.

अवैध वाळू वाहतूकदारांचे धाबे दणाणले!
अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीमुळे शासनाच्या महसुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांना स्पष्ट संदेश मिळाला आहे.
तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात अशाच प्रकारच्या धडक कारवाया सातत्याने सुरू ठेवाव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

✍🏻मुख्य संपादक – विनायक जगन्नाथ पाटील
























