मुख्य संपादक विनायक पाटील
व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ; मूळ थकबाकीच्या एकरकमी भरण्यावर २० टक्क्यांपर्यंत सवलत, ६ नोव्हेंबरपासून योजनेची अंमलबजावणी
दिवाळीच्या शुभपर्वाचे औचित्य साधून महावितरणने कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या बिगरकृषी वीजग्राहकांसाठी ‘अभय योजना २०२६-२७’ जाहीर केली आहे. मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या या योजनेमुळे थकबाकीदार ग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. शुक्रवार, दि. ६ नोव्हेंबर २०२६ पासून ते १५ जानेवारी २०२७ पर्यंत या योजनेची अंमलबजावणी होणार आहे.
या योजनेअंतर्गत ग्राहकांच्या एकूण थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराची १०० टक्के रक्कम माफ करण्यात येणार आहे. तसेच मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास ग्राहकांना २० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सवलत मिळणार आहे. याशिवाय वीजजोडणी पुन्हा सुरू करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील प्रकाशगड मुख्यालयात गुरुवारी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
१५ डिसेंबरपर्यंत भरणा केल्यास विशेष सवलत
योजना सुरू झाल्यापासून १५ डिसेंबर २०२६ पर्यंत मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा करणाऱ्या ग्राहकांना ‘अर्ली बर्ड रिबेट’चा लाभ मिळणार आहे. लघुदाब घरगुती व व्यावसायिक ग्राहकांची वीजजोडणी तीन वर्षांपर्यंत खंडित असल्यास १० टक्के, तर तीन वर्षांपेक्षा अधिक काळ खंडित असल्यास २० टक्के सवलत मिळेल. इतर लघुदाब व उच्चदाब ग्राहकांना अनुक्रमे १० आणि १५ टक्के सवलत दिली जाणार आहे.
हप्त्यांमध्ये भरण्याचीही सुविधा
ग्राहकांना मूळ थकबाकी एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. लघुदाब ग्राहकांना ५० टक्के आगाऊ रक्कम भरून उर्वरित रक्कम सहा समान व्याजमुक्त मासिक हप्त्यांत भरता येणार आहे. उच्चदाब ग्राहकांना थकबाकीनुसार तीन ते सहा व्याजमुक्त हप्त्यांची सुविधा उपलब्ध असेल.
तसेच २० किलोवॅटपर्यंत मंजूर भार असलेल्या ग्राहकांनी वीजजोडणी पुन्हा सुरू करताना प्रीपेड स्मार्ट मीटरचा पर्याय निवडल्यास मूळ थकबाकीमध्ये अतिरिक्त ५ टक्के सवलत मिळणार आहे. योजनेत सहभागी होणाऱ्या सर्व ग्राहकांचे पुनर्जोडणी शुल्क आणि लघुदाब ग्राहकांचे सर्व्हिस कनेक्शन शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे.
३४ लाखांहून अधिक ग्राहकांना लाभाची संधी
महावितरणच्या आकडेवारीनुसार, ३१ मार्च २०२६ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ३४ लाख ८६ हजार ग्राहकांकडे सुमारे ७ हजार ६५० कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये २ हजार ९२ कोटी रुपयांचे व्याज व विलंब आकार माफ होणार आहेत.
तर ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेल्या २ लाख ६० हजार ८२९ ग्राहकांकडे ४८८ कोटी ७८ लाख रुपयांची थकबाकी असून, त्यातील १६३ कोटी ९३ लाख रुपयांचे व्याज माफ केले जाणार आहे.
या योजनेचा लाभ घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर बिगरकृषी ग्राहकांना घेता येणार आहे. मात्र, कृषी व सार्वजनिक नळपाणीपुरवठा योजनांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. ग्राहकांना महावितरणच्या ऑनलाइन पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे सहजपणे अर्ज करता येणार आहे. थकबाकीमुक्त होण्यासाठी ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

✍🏻मुख्य संपादक – विनायक जगन्नाथ पाटील
























