मुख्य संपादक विनायक पाटील
चोपडा (प्रतिनिधी) : अमळनेर येथील एका विवाहित महिलेला हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक त्रास दिल्याप्रकरणी पतीसह सात जणांविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा ३ ऑक्टोबर २०२६ रोजी नोंदविण्यात आला.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर येथील पीडित महिलेचा विवाह चोपडा येथील आरोपी क्रमांक १ सोबत झाला होता. विवाहानंतर आरोपींनी संगनमताने महिलेकडे माहेरहून ५ लाख रुपये आणण्याची मागणी केल्याचा आरोप आहे. महिलेच्या वडिलांनी आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही १ लाख ५० हजार रुपये दिले होते. मात्र त्यानंतरही आरोपींकडून पैशांसाठी तगादा लावण्यात येत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तसेच आरोपींनी पीडितेला शिवीगाळ, मारहाण, मानसिक छळ व धमक्या दिल्याचा आरोप असून, “पैसे आणले नाहीत तर तुला घरात ठेवणार नाही” अशा स्वरूपाच्या धमक्या देण्यात आल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. या प्रकारामुळे पीडित महिलेला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला.
या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ८५, २९६, ३१८(२), १३१, ११५(२), ३५१(२), ३(५) तसेच मुस्लिम महिला विवाह हक्कांचे संरक्षण अधिनियम २०१९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार जगनाथ अशोक पाटील करीत आहेत.

✍🏻मुख्य संपादक – विनायक जगन्नाथ पाटील
























