मुख्य संपादक विनायक पाटील
चोपडा (प्रतिनिधी) : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे सरसकट पंचनामे करण्यात यावेत, तसेच त्यामध्ये केळी पिकांचाही समावेश करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील पाटील (वाळकी) यांच्यासह शेतकऱ्यांनी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन दिले.
महाराष्ट्रातील इतर भागांत पिकांच्या पंचनाम्यांमध्ये केळी पिकांचाही समावेश केला जात असल्याचे नमूद करत चोपडा तालुक्यातही सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. केळी हे चोपडा तालुक्यातील महत्त्वाचे पीक असून, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी पंचनामे करून नुकसानभरपाई देणे आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे.
या मागणीचे निवेदन राज्याचे कृषिमंत्री, जिल्हाधिकारी, कृषी अधीक्षक आणि तालुका कृषी अधिकारी यांनाही ई-मेलद्वारे पाठविण्यात आले आहे.
या निवेदनावर सुनील पाटील (वाळकी), इंजि. सचिन सांगोरे, रवींद्र नथ्थू पाटील, अविनाश चुडामण शिंदे, पंकज साहेबराव पाटील, रामकृष्ण पुंडलिक पाटील, अशोक शालीग्राम पाटील, भागवत दामोदर सोनवणे, सुभाष तुकाराम पाटील, देविदास गुलाबराव बोरसे, प्रकाश पाटील आणि राजू धनगर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
शेतकऱ्यांची प्रमुख मागणी : चोपडा तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्त पिकांचे, विशेषतः केळी पिकांचे, सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नियमानुसार नुकसानभरपाई देण्यात यावी.

✍🏻मुख्य संपादक – विनायक जगन्नाथ पाटील
























