मुख्य संपादक विनायक पाटील
जळगाव (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी ‘ऑपरेशन ऑल आऊट’ ही विशेष मोहीम राबवली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत अवैध धंदे, जुगार, दारूविक्री, शस्त्रे बाळगणे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व संबंधित शाखांच्या पथकांनी विविध ठिकाणी एकाच वेळी तपासणी, नाकाबंदी आणि गस्त घातली. अवैध गावठी हातभट्टी दारूविक्रीविरोधात ११८ गुन्हे दाखल करून ११८ आरोपींवर कारवाई करण्यात आली. यामध्ये ५,३७७ लिटर गावठी दारू, रसायन, बांबू व इतर साहित्य असा एकूण सुमारे ५ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. देशी व विदेशी दारूविक्रीप्रकरणीही चार गुन्हे दाखल करून पाच आरोपींवर कारवाई करण्यात आली.
जुगारविरोधी कारवाईत ७२ गुन्हे दाखल करून ८५ आरोपींवर कारवाई करण्यात आली. तसेच शस्त्र अधिनियमानुसार गावठी कट्टा व तलवार जप्त करण्यात आली. मोटार वाहन कायद्यांतर्गत वाहतूक शाखा आणि पोलीस ठाण्यांमार्फत अनुक्रमे १,१९८ आणि ७७८ केसेस करण्यात आल्या. यातून दंडाची वसुलीही करण्यात आली.
महिला व मुलांच्या सुरक्षिततेवर विशेष लक्ष
हरविलेल्या महिला, पुरुष, मुली व मुलांचा शोध घेण्यावरही पोलिसांनी विशेष भर दिला. मोहिमेदरम्यान ६२ महिला, ४६ पुरुष, ३० मुली आणि २१ मुलांचा शोध घेण्यात आल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे. भंगार दुकानांची तपासणी, पानटपऱ्यांवरील कारवाई, विद्युत मोटार व वायर चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे, अवैध वाळू वाहतूक, अमली पदार्थांविरोधातील कारवाई आणि पाहिजे असलेल्या आरोपींना पकडण्याची मोहीमही राबविण्यात आली.
याशिवाय मद्यप्राशन करून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांविरुद्ध ३५, मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध ३६ केसेस करण्यात आल्या. सायबर रिल्ससंदर्भात २१ कारवाया, ईओडब्ल्यू अंतर्गत रक्कम ब्लॉक करण्याच्या पाच कारवाया तसेच समन्स-वॉरंट बजावणी आणि हॉटेल-ढाब्यांच्या तपासण्याही करण्यात आल्या.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि विविध शाखांच्या पथकांनी ही मोहीम यशस्वी केली.
नवरात्रोत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात साजरा करावा, अफवांवर विश्वास ठेवू नये, संशयास्पद हालचाली आढळल्यास पोलिसांना माहिती द्यावी तसेच मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असे आवाहन जळगाव जिल्हा पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

✍🏻मुख्य संपादक – विनायक जगन्नाथ पाटील
























