मुख्य संपादक विनायक पाटील
शनिवारी रात्री ९.१० वाजता सौभाग्य लॉन्ससमोर उदय महाजन यांच्यासमोर बिबट्या; आज दुपारी चहाडी शिवारातही पुन्हा दर्शन, वनविभागाकडे जेरबंद करण्याची मागणी
चोपडा (प्रतिनिधी) : चोपडा तालुक्यातील अक्कुलखेडा व चहाडी शिवारात बिबट्याचा वावर आढळून येत असल्याने परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शनिवारी रात्री सुमारे ९ वाजून १० मिनिटांच्या सुमारास अक्कुलखेडा येथील रहिवासी उदय महाजन हे शेतातून घरी परतत असताना सौभाग्य लॉन्ससमोर अचानक त्यांच्यासमोर बिबट्या आला. अचानक बिबट्या समोर आल्याने महाजन काही क्षण घाबरून गेले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे, आज दुपारी चहाडी शिवारातही पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी शेतकऱ्यांनी बिबट्याचे छायाचित्र मोबाईलमध्ये टिपले. सलग दोन ठिकाणी बिबट्याचा वावर दिसून आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण अधिकच वाढले आहे.
सध्या शेतांमध्ये शेतीची कामे सुरू असून शेतकरी रात्री-अपरात्री पिकांना पाणी देण्यासाठी तसेच इतर कामांसाठी शेतात जात असतात. अशा परिस्थितीत बिबट्याच्या वावरामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वनविभागाने या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन अक्कुलखेडा व चहाडी शिवारात तातडीने गस्त वाढवावी, आवश्यक त्या ठिकाणी पिंजरे लावावेत आणि बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करावे, अशी मागणी उदय महाजन यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ व शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.

✍🏻मुख्य संपादक – विनायक जगन्नाथ पाटील
























