मुख्य संपादक विनायक पाटील
पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, शिर्डी, सुरतसह विविध मार्गांवर विशेष बसफेऱ्यांचे नियोजन; ५ ते ७ नोव्हेंबरदरम्यान पुण्याहून चोपड्यासाठीही जादा बसेस
चोपडा (प्रतिनिधी) : दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चोपडा आगारातर्फे नियमित बसफेऱ्यांव्यतिरिक्त मध्यम व लांब पल्ल्याच्या मार्गांवर जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत गावी येणाऱ्या तसेच बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
चोपडा आगारातर्फे पुणे, छत्रपती संभाजीनगर, बदलापूर, नाशिक, शिर्डी, सुरत, साक्री आणि नंदुरबार या मार्गांवर विशेष बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
जादा बसफेऱ्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
– चोपडा–पुणे (नगर मार्गे) : चोपड्याहून सायंकाळी १८:१५ वाजता, तर पुण्याहून परतीची बस १८:२५ वाजता.
– चोपडा–पुणे (एरंडोल, चाळीसगाव, कन्नड, गंगापूर, लासूर स्टेशन, नेवासा फाटा मार्गे) : चोपड्याहून सकाळी ७:०० वाजता, तर परतीची बस ८:०० वाजता.
– चोपडा–छत्रपती संभाजीनगर : जाण्यासाठी सकाळी ७:०० वाजता, तर परतीसाठी दुपारी १३:०० वाजता.
– चोपडा–बदलापूर : जाण्यासाठी सायंकाळी १९:०० वाजता, तर परतीची बस सायंकाळी १९:०० वाजता.
– चोपडा–नाशिक : जाण्यासाठी सकाळी ५:०० वाजता, तर परतीसाठी दुपारी १३:०० वाजता.
– चोपडा–शिर्डी : जाण्यासाठी सकाळी ७:०० वाजता, तर परतीसाठी दुपारी १३:०० वाजता.
– चोपडा–सुरत : जाण्यासाठी सकाळी १०:०० वाजता, तर परतीसाठी १७:०० वाजता.
– चोपडा–साक्री (शिंदखेडा, दोंडाईचा, दुसाने, इंधवे, निजामपूर मार्गे) : जाण्यासाठी सकाळी ६:३० वाजता.
– चोपडा–नंदुरबार (अमळनेर, शहापूर मार्गे) : जाण्यासाठी सकाळी ७:३० वाजता, तर परतीसाठी १२:३० वाजता.
तसेच, दि. ५ ते ७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पुण्याहून चोपड्यासाठी रात्री २०:३०, २०:४० आणि २०:५० वाजता जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
एसटी महामंडळाची दर्जेदार सेवा, अनुभवी चालक, सुरक्षित प्रवास आणि अत्याधुनिक बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना उत्तम सुविधा देण्याचा चोपडा आगाराचा प्रयत्न आहे. दिवाळीनिमित्त सोडण्यात येणाऱ्या या जादा बससेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन चोपडा आगार व्यवस्थापक संदेश क्षीरसागर यांनी केले आहे.
बंद पडलेली पुणे बसफेरी पुन्हा सुरू
चोपडा आगाराकडून बंद पडलेली चोपडा–पुणे बसफेरी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. चोपडा, एरंडोल, चाळीसगाव, कन्नड, गंगापूर, गल्ले बोरगाव, लासूर स्टेशन, नेवासा फाटा आणि नगरमार्गे पुण्याला जाणारी ही बससेवा पुन्हा सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या निर्णयाचे प्रवाशांकडून स्वागत करण्यात येत आहे.

✍🏻मुख्य संपादक – विनायक जगन्नाथ पाटील
























