मुख्य संपादक विनायक पाटील
रामपुरा परिसरात वीज ग्राहकांना योजनांची माहिती; थकबाकीवरील व्याज व दंड माफीसह पात्र ग्राहकांना अल्पदरात सोलर पॅनल बसविण्याचे आवाहन
चोपडा (प्रतिनिधी) : महावितरणतर्फे चोपडा शहरातील रामपुरा परिसरात वीज ग्राहकांसाठी अभय योजना व स्मार्ट सोलर योजनेबाबत जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी परिसरातील वीज ग्राहकांना दोन्ही योजनांचे उद्दिष्ट, फायदे, मिळणाऱ्या सवलती तसेच पात्रतेचे निकष याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

महावितरणच्या अभय योजनेमुळे जुन्या वीज थकबाकीदार ग्राहकांना आर्थिक दिलासा मिळणार असून, थकबाकीवरील व्याज व दंड माफ करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे पात्र ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपली जुनी थकबाकी नियमित करावी, असे आवाहन करण्यात आले.
तसेच स्मार्ट सोलर योजनेअंतर्गत १०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या पात्र ग्राहकांसह अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमधील पात्र ग्राहकांना अत्यल्प दरात सोलर पॅनल बसविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सौर ऊर्जेचा वापर वाढवून वीज बिलात बचत करण्यासाठी ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असेही महावितरणच्या वतीने सांगण्यात आले.

या जनजागृती उपक्रमावेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता संदीप बोरसे, सहाय्यक अभियंता तुषार कापगते, प्रबुद्ध सोनवणे तसेच महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते. ग्राहकांनी योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केले.

✍🏻मुख्य संपादक – विनायक जगन्नाथ पाटील
























