मुख्य संपादक विनायक पाटील
खान्यापाडा शिवारातील वनक्षेत्रात बेकायदेशीर गांजाची लागवड उघड; १ हजार ८७० किलो गांजासह स्वराज ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त, संशयित आरोपी फरार
चोपडा (प्रतिनिधी) : चोपडा तालुक्यातील खान्यापाडा शिवारात वनक्षेत्रातील कंपार्टमेंट क्रमांक २४० मध्ये बेकायदेशीररीत्या गांजाची लागवड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार चोपडा ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला आहे. पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईत तब्बल १ हजार ८७० किलो गांजासदृश अंमली पदार्थ जप्त केला असून, त्याची अंदाजित किंमत ४ कोटी ६७ लाख ५० हजार रुपये असल्याचे पोलिसांच्या विशेष अहवालात नमूद करण्यात आले आहे.
ही कारवाई १० नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात आली. वनक्षेत्रात गांजाची लागवड करून त्याची विक्री करण्याच्या उद्देशाने पिकाचे संवर्धन व जोपासना केली जात असल्याची बाब पोलिस तपासात समोर आली आहे.
या गांजाची किंमत प्रति किलो २५ हजार रुपये प्रमाणे एकूण ४ कोटी ६७ लाख ५० हजार रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. तसेच तपासणीसाठी गांजाच्या पिकाचे नमुने आणि लागवड केलेल्या जमिनीतील मातीचे नमुने कागदी पाकिटात काढण्यात आले आहेत.
संशयित आरोपी फरार; एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल
या प्रकरणी जुम्मा आरसी पावरा (रा. खान्यापाडा, ता. चोपडा, जि. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो सध्या फरार असल्याचे पोलिस अहवालात नमूद आहे. चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १२६/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम २०(अ), २२, २८ व २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास
या कारवाईस चोपडा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा तपास चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सोनवणे करीत आहेत.
गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश पाटील यांनी केली असून, आर.टी.पी.सी. पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील यांचाही अहवालात उल्लेख आहे.
या गुन्ह्यात फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल क्रमांक ६१८ शुभम ज्ञानेश्वर पाटील (वय ३३) यांनी दिली आहे. ते चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस आहेत.
वनक्षेत्रात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजाची लागवड करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. फरार संशयित आरोपीचा शोध घेणे, गांजाच्या लागवडीमागील आर्थिक व्यवहार तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास आता पोलीस करीत आहेत.
चोपडा ग्रामीण पोलिसांच्या या मोठ्या कारवाईमुळे अवैध अंमली पदार्थांच्या लागवडीविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

✍🏻मुख्य संपादक – विनायक जगन्नाथ पाटील
























