जळगाव (प्रतिनिधी) : धरणगाव येथून चोरीला गेलेली २५ हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची सीबी शाइन मोटारसायकल जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत केली आहे. या प्रकरणी मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील रहिवासी आरोपी मनोज केदार बारेला याला ताब्यात घेण्यात आले असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला धरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ५ वाजता फिर्यादी यांच्या मालकीची काळ्या रंगाची होंडा सीबी शाइन मोटारसायकल (क्रमांक MH-19-DL-0268) धरणगाव बसस्थानकासमोरील रस्त्यावर पार्क करण्यात आली होती. पंचायत समिती परिसरात कामानिमित्त गेलेले फिर्यादी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास परत आले असता, त्यांना मोटारसायकल दिसून आली नाही. अज्ञात चोरट्याने मोटारसायकल चोरून नेल्याची तक्रार त्यांनी पोलिसांत दिली होती.

या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राहुल गायकरवाड यांना समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज संकलित केले. तसेच तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
तपासादरम्यान आरोपी मनोज केदार बारेला, रा. हुगाने, ता. सेंधवा, जि. बडवाणी, राज्य मध्य प्रदेश, याच्याबाबत माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कौशल्यपूर्ण चौकशी केली असता, त्याने मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. त्याच्याकडून चोरीची २५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल हस्तगत करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव परिमंडळाचे पोलीस अधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकरवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या पथकात पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी विष्णू बिऱ्हाडे, दीपक माळी, हरिलाल पाटील, रवींद्र पाटील, रवसाहेब पाटील, राहुल कोळी, महेश सोमवंशी, गोपाल पाटील तसेच तपासी अंमलदार जितेंद्र चव्हाण यांचा सहभाग होता.

चोरीच्या गुन्ह्याचा तपास करून मोटारसायकल हस्तगत केल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुक होत आहे.

✍🏻मुख्य संपादक – विनायक जगन्नाथ पाटील
























